आठवणी शाळेतल्या !

       शाळेत जाण्याचा मला लहानपणापासून तिटकारा.अर्थात आमच्या काळी ही सार्वत्रिक गोष्ट होती.म्हणजे हौसेने शाळेत जाणारा मुलगा क्वचितच दिसे.बहुतेक पहिले काही दिवस मारपीट करूनच पोराला शाळेत पाठवावे लागे.शिवाय त्याचे पालक शाळेत येऊन परत "त्या पोराला चांगला बडवा, मुळीच गय करू नका त्याची" असे बजावत असल्याने शाळा म्हणजे मार खाण्याची जागा ही  त्या मुलाची समजूत आणखीनच दृढ व्हायची.त्यामानाने मुली मात्र हौसेने शाळेत जात.त्याचे एक कारण असे असू शकेल की बिचाऱ्या मुलींच्यावर घरातील कामाचा बोजा पडत असल्याने शाळेत जाऊन आराम करणे त्याना अधिक पसंत पडत असणार.त्यामुळे माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी शाळेत जात होत्या कारण माझ्या सारख्या रडक्या भावंडाला संभाळण्यापेक्षा शाळेतच बरे असे त्याना वाटत असावे.
       पण मी मात्र शाळेत जाण्याचे नाव घेत नव्हतो.बर माझे वडीलही स्वत: शिक्षक असूनही मला शाळेत जाण्याचा मुळीच आग्रह करत नव्हते,"जाईल हळु हळु " आता हे हळू हळू म्हणजे केव्हां हे संदिग्धच होते.बर त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर स्टीव्ह जॉब्ज किंवा बिल गेट्सची उदाहरणेही नव्हती की आपला मुलगा शाळेत न जाताच काहीतरी भव्य दिव्य करू शकेल असे वाटावे.येऊन जाऊन रविंद्रनाथ ठाकूरांच्या पिताजींच आदर्श त्यानी डोळ्यासमोर ठेवला असल्यास नकळे. तसा मी घरातल्या घरात अभ्यास करत होतो पण शाळेचे नाव काढले की माझे पोट दुखू लागे.अखेर माझी मोठी बहीण मॅट्रिक होऊन प्राथमिक शाळेतच मास्तरीण म्हणून लागली आणि मग मात्र तिने दर दर ओढून नेण्याची वाट न बघता मी शाळेत जाऊ लागलो.                 
         त्यावेळी शाळेत जाण्यासाठी पाच वर्षे पूर्ण असावीत हा नियम अस्तित्वात नसावा,आणि त्याची आवश्यकताही नव्हती. कारण बहुतेक मुले वयाची सात वर्षे पूर्ण झाल्यावरच शाळेत जाऊ लागत.मात्र ज्यू. व सीनियर  केजी असले काही गोड प्रकार त्यावेळी नव्हते.  त्यामुळे पोरगा एकदम पहिलीतच जाऊ लागे.त्यापूर्वी काही दिवस पहिलीपूर्वी एक वर्ष त्याला एलफन्डी  म्हणत ते अस्तित्त्वात होते. (एलिमेन्टरीचा अपभ्रंश ? की इन्फन्ट्रीचा?  एलफंड हा कशाचा अपभ्रंश हे शोधण्याचा बराच प्रयत्न मी केला पण अगदी व्यंकटेश माडगूकरांच्या शाळेच्या वर्णनातही त्यांनी एलफंड हाच शब्द वापरला आहे).कसे का होईना मी  बहिणीबरोबर  शाळेत जाऊ लागलो . .
     औंधासारख्या खेडॅगावात शाळांचे अनेक पर्याय उपलब्ध असण्याचा प्रश्नच नव्हता.मी ज्या शाळेत जाऊ लागलो.ती एकच शाळा त्यावेळी होती. आणी ती  मुलामुलींची मिश्र शाळा होती. मी ताईचा हात पकडून  सुरवातीस शाळेत गेलो तरी पुढे पुढे मी एकटाही शाळेत जाऊ लागलो.त्यावेळी एक माझ्याच वर्गातली मुलगी पण माझ्याबरोबर शाळेत येत असे.शाळेत जाण्याचा रस्ता फारतर दहा पंधरा मिनिटे चालत जाण्याचा होता.आमच्या  सगळ्या गावाला फेरा घालायला फार फार तर एक तास लागे  तरी हेही अंतर फार वाटे शिवाय  त्या वाटेवर एक वेडी पोरगी आम्हा दोघांना अडवत असे कधी एकादे कुत्रे आडवे येत असे पण या संकटांना तोंड देत शिवाय त्या मुलीला सांभाळत ( का तीच मला संभाळत होती?)माझी शाळा सुरू झाली.
       या शाळेत माझी पहिली इयत्ता कशी बशी पार पदली आणि अचानक मुलामुलींच्या शाळा वेगळ्या करण्याचे ठरले.तो बहुधा लोकल बोर्डाचा निर्णय असावा कारण आता संस्थाने खालसा झाली होती. आता ती शाळा मुलींची म्हणून भरू लागली. आणि आमची मुलांची हकालपट्टी तळ्यावरच्या शाळेत झाली .
       तळ्यावरची शाळा  गावातील तळ्याजवळ असलेल्या धर्मशाळेत भरत असे. तेथे मी दुसऱ्या यत्तेत जाऊ लागलो. वर्गशिक्षक एरलवाडीकर इनामदार हे कडक मास्तर म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे आता या शाळेत आपले कसे होणार ही धास्तीच माझ्या मनात होती पण माझी हुशार म्हणून प्रसिद्धी त्यांच्या कानावर गेल्यामुळे ते मला फारच प्रेमळपणाने वागवू लागले. कधी कधी चौथीच्या वर्गात मला नेऊन पुस्तक वाचायला लावत व "बघा बघा पोरगं कसं पुस्तक वाचतय. त्याचं तीर्थ घ्या जरा" असा उपदेशही त्या मुलांना करत. या शाळेच्या इमारतीत  पहिले चार वर्ग भरत. त्यावेळी पहिलीला महार असेच आडनाव लावणारे मास्तर होते तर तिसरीला बुटे मास्तर होते. त्यांची एक खासियत होती.ती म्हणजे एकाद्या मुलाला शिक्षा करायची असेल तर त्याचे मनगट आपल्या दणकट मुठीत पकडून त्या मनगटावरचे कातडे आपला अंगठा आणि मधले बोट यामध्ये करकचून दाबत.पहाणाऱ्याला ते अगदी प्रेमाने हस्तांदोलन करताहेत असे वाटे प्रत्यक्षात ते पोरगे त्या वेदनेने "ओय ओय "म्हणून ओरडू लागे. ते नेहमी पांढरा शुभ्र शर्ट, तसेच स्वच्छ धोतर, पांढराच कोट आणि टोपी घालत. 
       चौथीला माने मास्तर त्यावेळी  होते.यांचा एक डोळा इतका तिरळा  होता की ते कोणाकडे पहात आहेत हे समजत नसे.पण आम्ही चौथीत गेळ्यावर पुन्हा एरळवाडीकर इनामदारच आमचे वर्गशिक्षक म्हणून आले त्यामुळे माने मास्तरांना माझ्याकडे पाहण्याआ योगच आला नाही.
      शाळेचे मुख्याध्यापक शांताराम इनामदार शाळेच्याच प्रवेशद्वाराजवळील काही खोल्या होत्या त्यात रहात असत.ते अतिशय प्रेमळ गृहस्थ होते पण मुख्याध्यापक असल्यामुळे त्यांच्याकडे उगीचच जाण्याचे धाडस होत नसे.येऊन जाऊन संक्रांतीला तिळगूळ व दसऱ्याला सोने देण्यासाठी सर्च मुलांबरोबर मीही जात असे.त्यांची एक मुलगी आमच्या वर्गात होती.
        घरात ताई माझा बराच अभ्यास करून घेत असल्यामुळे माझा  बराच पुढचा  अभ्यास झालेला होता त्यामुळे मला त्या वर्षी दुसरी ऐवजी तिसरीच्या परीक्षेला बसवावे व एक इयत्ता गाळून तिसरी ऐवजी चौथीत घालावे असा विचार वडील मंडळींनी केला व काही दिवस बुटे मास्तरांच्या वर्गात बसण्याचा योग मला आला.अर्थात त्यांच्या त्या विशिष्ट शिक्षेचा मला एकदाच अनुभव मी दंगा करण्याचे निमित्त झाल्याने आला
    तळ्याच्या काठी एक दगडी बांधकामाचे देऊळ होते त्याच्या समोर मधल्या सुट्टीत मुले काहीतरी खेळत वा गप्पा मारत बसत. तळ्याच्या एका  घाटावर मोकळाईचे देऊळ होते त्यामुळे त्याला मोकळाईचा घाट म्हणत तर एका घाटावर बहुधा ब्राह्मणाच्या बायका धुण्यासाठी कपडे घेऊन येत म्हणून त्यामुळे त्यास ब्राह्मण घाट तर त्याच्या समोरील घाटास पैलवान घाट म्हणत .तळ्याला एकूण पाच घाट होते.तळे बरेच मोठे म्हणजे १५० फूट लांब व १०० फूट रुंद  होते.मध्यभागी एक खांब रोवलेला होता.ब्राम्हण घाटाकडून पैलवान घाटास पोहत जाऊन मध्ये खांबापाषी विश्रांती घेणे व तसेच परत  येणे असा उपक्रम काहीजण करत तर तळ्याच्या चारी बाजूने एक सलग वेढा घेण्याचा उपक्रम कडवेढाही काहीजण करत,
      तळ्य़ात दरवर्षी एकाचा तरी बुडून मृत्यू होत असे त्याला तळ्यातील आसरा (अप्सरा?) ओढून नेतात असेम्हटले जाई.माझ्या मावशीचे यजमान पट्टीचे पोहणारे म्हणून प्रसिद्ध पण तेही असेच तळ्यात बुडून मरण पावले. तळ्यातील पाणी अगदी हिरवेगार दिसे व त्यात आम्ही पोहायला शिकताना बऱ्याच गटांगळ्या खाल्या व बरेच पाणी पोटात जाऊनही आम्हाला काही आजार झाला नाही हे आश्चर्यच. गणपति विसर्जन याच तळ्यात होत असे व अजूनही होत असेल. तळ्याच्या पलीकडे आणखी एक तळे होते पण त्यात पाणी नव्हते.त्यापलीकडे आमराई होती त्याला शेरी म्हटले जाई.या शेरीतल्या झाडावर किंवा खाली बसून उन्हाळ्यात दुपारची सुट्टी असल्यामुळे आम्ही अभ्यास करायला यायचो.अर्थात त्या वेळी कैऱ्या पण खाल्ल्या जायच्या. 
          त्यावेळी संस्थान विलीन झाले असले तरी संस्थानी वातावरणाचा पगडा अजून गेला नव्हता त्यामुळे या शाळेची वेळ सकाळ व दुपार अशी असे.सकाळी आठ वाजता प्रार्थना असे. ती प्रत्येक वाराची वेगळी म्हणजे सोमवारी "नमन प्रभुपदा " मंगळवारी "मंगल दिन हा " शनिवारी "वंदन त्या ईशा"अश्या असत त्यांच्या चालीही रागांवर आधारित असत.त्यानंतर पहिले दहा मनाचे श्लोक म्हणून प्रार्थना संपत असे.मंगळवारी  गावचा बाजार असल्याने शाळा फक्त सकाळीच असे.
     सूर्यनमस्कार हा संस्थानचा महत्त्वाचा उपक्रम होता.औंधचे महाराज श्रीमंत भवानराव ऊर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी सूर्यनमस्काराचे भोक्ते होते व त्यानी हा उपक्रम संस्थानच्या सर्व शाळांतून राबवल व संस्थान विलीन झाले तरी तो बरेच दिवस चालू राहिला.नमस्कारानंतर आम्ही घराच्या दिशेने पळ काढत असू व शिंक्यावर ठेवलेली शिळी भाकरी व दही किंवा लाह्याचे पीठ कालवून त्याचा लाडू असे काहीतरी खाऊन पुन्हा शाळेत येत असू.त्यानंतर दोन तास होऊन शाळा सुटे.दुपारी २ वा. पुन्हा भरे व संध्याकाळी ५-३० वा.सुटे.
      तळ्याजवळच्या शाळेतील मुक्काम दोन वर्षात संपला व पाचवीपासून दुसऱ्या इमारतीत आमचे वर्ग भरू लागले.. ही इमारत देवस्थानचीच असावी कारण त्याच्या मागील बाजूस नवरात्र मंडप व बोर्डिंग होते. त्या सगळ्या इमारती अम्बाबाईच्या देवळास लागून होत्या.मंदिराच्या समोर मोठे पटांगण त्यात दोन छोट्या व एक मोठी दीपमाळ होती.देवीच्या समोर देवीकडे तोंड करून मोठा नंदी होता.व डाव्या बाजूस देवस्थानची इमारत होती त्यात वसतीगृह होते.बाहेरगावची मुले त्यात रहात.साने गुरुजींच्या काळात विद्यार्थ्यांना मोफत जेवण मिळत असे तो भाग नवरात्र मंडपातील भोजनशाळा म्हणजेच ज्याला आम्ही बोर्डिंग म्हणत असू तो होता.नवरात्र मंडपात नवरात्रातील नऊ दिवस गावभोजन होत असे त्याला रमणा म्हणत.तेथे फक्त आपले  फुलपात्र  घेऊन जायचे व येणाऱ्या प्रत्येकास जेवण मिळत असे.त्याची भोजन सिद्धी या भोजनशाळेत होत असावी.कारण हा उपक्रम मी लहान असतानाच चालत असल्याचे आठवते.
         श्री लाळे मास्तर हे आम्ही पाचवीच्या वर्गात असताना आमचे वर्गशिक्षक होते.अतिशय प्रेमळ गृहस्थ.म्हणजे येरळवाडीकर व बुटे मास्तरांच्या तावडीतून सुटून लाळेमास्तरांच्या वर्गात येणे म्हणजे एकदम नरकातून स्वर्गातच जाण्यासारखी परिस्थिती.मुलांना मारायचे त्यांच्या जिवावरच येत असे आणि मारले तरी अगदी हलकासा धपाटा ठेवून द्यायचे.एकदा त्यांची छडी खाण्याची वेळ माझ्यावर आली पण तीही त्यानी अगदी नाजूकपणे मारली आणि तरीही आपण मोठाच अपराध केल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसली. लाळे मास्तर मार्कही अगदी सढळपणे द्यायचे.अगदी मराठी भाषेच्याही विषयात ते ९०% मार्क द्यायचे. आमचे दादा म्हणजे माझे वडीलही तसे मार्क देण्यात सढळच पण बहुधा गणिताचेच पेपर त्यांच्याकडे असायचे त्यामुळे तेथे त्यांच्या सढळपणाला वाव नव्हता.पण एकदा कधीतरी मराठीचे पेपर त्यानी तपासले व मला त्या पेपरात ८० मार्क मिळाले.आमचे शेजारी त्यावेळी घरमालकच होते व तेही मराठीचेच शिक्षक होते अर्थात ते शिक्षकाचे काम करत नव्हते.त्यावेळी त्यानी सहज काय किती मार्क पडले असे विचारले व त्यात मराठीत ८० म्हटल्यावर "असे कसे काय गजानन मास्तरांनी (दादांनी) इतके मार्क दिले मराठीत फारफार तर ६५ ते ७० द्यायला हवेत "असे उद्गार काढले.पण पुढे मला एस.एस.सी.लाच मराठीच्या पेपरात ८४% मार्क पडले हे अर्थात त्यांच्या कानापर्यंत पोचले नाही कारण त्यावेळी ते पुण्यात होते.
       त्यावेळी भंडारे  मास्तर हे तरुण शिक्षक नव्याने त्या शाळेत रुजू झाले होते.ते अगदी तरुण व दिसायला रुबाबदार होते.व रहायचेही अगदी ऐटीत. त्यावेळी गणेशोत्सव किंवा अश्याच कार्यक्रमाचे वेळी शिक्षकांचाही सहभाग म्हणून त्यानी ऐटीत दहा रु.ची नोट काढून आपला सहभाग व्यक्त केला त्यावेळी सर्व मुलांनी त्यांचे फारच कौतुक केले. कारण त्यावेळी दहा रु.देण्याचे धाडस करणे म्हणजे साधी गोष्ट नव्हती.ते आम्हाला शिकवायला नव्हते पण परीक्षेचे एकाद्या विषयाचे पेपर त्यांच्याकडे तपासायला गेले असे कळल्यावर आम्ही त्यांच्याकडे जाऊन मार्क सांगा असा आग्रह धरायचो.तेव्हांही ते आमच्याशी फारच विनोदी बोलून  वागायचे त्यामुळे प्रत्यक्ष शिकवायला नसूनही ते आम्हाला आवडायचे.
     पण पुढे काही वर्षांनी ते इतके गबाळेपणाने वागू लागले की  एकेकाळी  ते इतके उत्साही आणि टापटिपीचे  होते यावर कुणाचा विश्वासही बसला नसता. इतकेच काय पुढे माझी बहीण ताई मुलांच्याच शाळेत काम करू लागली त्यावेळी  ताईचा हा वर्ग अतिशय खोडकर मुलांचा म्हणून प्रसिद्ध होता म्हणून मुद्दामच तिला त्या वर्गावर नेमण्यात आले होते पण तिने आपल्या करड्या शिस्तीने व शिकवण्यातील कौशल्याने त्या वर्गावर असा प्रभाव पाडला की व्यंकटेश माडगूळकरांच्या झेल्यासारखेच तिचे काही विद्यार्थी तिची दुसऱ्या वर्गावर बदली झाल्यावर अक्षरश: घळाघळा रडले. त्यात हनीफ नावाचा एक विद्यार्थी अजून आठवतो. त्यावेळी एका शिक्षकाचा पाठ त्या वर्गावर व भंडारी मास्तर निरीक्षक होते तर विद्यार्थ्यांनी इतका गोंधळ घातला की त्यानी"अहो बाई जरा हा वर्ग सांभाळा" अशी विनवणी  ताईलाच केली.
      आम्हाला सहावीला मात्र कुंभार गुरुजी हे अतिशय शिस्तीचे भोक्ते शिक्षक मिळाले.ते स्वत: अतिशय टापटिपीने वागत.स्वच्छ पांढरा शर्ट,पांढरे शूभ्र धोतर,स्वच्छ तपकिरी कोट व टोपी असा त्यांचा वेष असे.त्यांचा कल ख्रिस्ती धर्माकडे होता की काय कोणास ठाऊक कारण त्यानी आम्हाला एक प्रार्थना शिकवली होती  ती अशी होती
मेंढपाळ हा प्रभू कधीचा हिरव्या कुरणी मला
कधी मनोहर जलाशयावर घेउन मज चालला
निष्कंटक हा राजमार्ग तो मला सदा दावतो
मध्येच भेसुर मेघ मृत्युचा वरती डोकावतो
परंतु माझा सखा असे प्रभु सदैव आपंगिता
या श्रद्धेने भीति न बिलगे दरीतुनी चालता
    यामधील मेढपाळ ही कल्पना ख्रिस्ती धर्मातील आहे असे मला वाटे. तरी ही प्रार्थना म्हणायला शाळेने  परवानगी  दिली होती  हे आश्चर्य किंवा माझी ही या प्रार्थनेविषयीची धारणा चुकीचीही असू शकेल.
    प्राथमिक शाळेत आम्हाला निवृत्ती कृष्णा शिंदे या नावाचे चित्रकला शिक्षक होते.तेही अतिशय प्रेमळ.चित्रकला उत्तम असून कल्पकताही असल्यामुळे त्यानी मुळाक्षरांचा एक तक्ता करताना प्रत्येक मुळाक्षर योग्य चित्रातून दाखवण्याची करामत केली होती.म्हणजे ह हे अक्षर हत्तीच्या सोंडेचे व मस्तकाचे चित्र काढून त्यातून ते हत्तीसारखे व ह या अक्षरासारखे दिसेल असे काढले असल्यामुळे तो हत्ती आहे हे व ह हे अक्षर आहे या दोन्ही गोष्टींचा बोध व्हायचा.
        त्यांना कविता करण्याचाही छंद होता त्यामुळे प्रसंगानुरूप व इतरही प्रकारच्या कविता ते करत असत.त्याचवरोबर त्यानी घरगुती उद्योग म्हणून बेकरी घरात काढली होती व त्यात ते ब्रेड ,बिस्किटे तयार करत व पेठेत एक दुकान काढून त्याची विक्री करत.
         आमची प्राथमिक शाळा त्यावेळी लोकल बोर्डाची होती त्यामुळे औंध शिक्षण मंडळ या खाजगी संस्थेच्या प्रायमरी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजच्या  विद्यार्थ्यांना पाठ घेण्यासाठी त्या शाळेचा उपयोग काही मर्यादेपर्यंत होत असे पण त्यावेळी सातवीची परीक्षा महत्त्वाची समजली जाई व ती बोर्डातर्फे घेतली जाई त्यामुळे पाठासाठी आपल्या विद्यार्थ्यांचा वेळ जाऊ नये असे शाळेचे धोरण असे.त्यात पुन्हा ट्रेनिंग कॉलेज औंध शिक्षण मंडळाचे म्हणजे खाजगी संस्थेचे आणि त्यावेळेपर्यंत मुले आणि शिक्षक यांचा वेळ कोणत्याही फालतू गोष्टीसाठी जाऊ देण्याचे धोरण शिक्षण खात्याच्या अंगी मुरले नव्हते त्यामुळे सातवीचे पाठासाठी वर्ग उपलब्ध कमी होत असे.
     औंध शिक्षण मंडळाने त्यावर उपाय म्हणून एक सातवीचा वर्गच हायस्कूलला जोडून काढायचे ठरवले..हायस्कूलला सातवीचा वर्ग जोडल्यावर मला तरी त्यातच प्रवेश घेणे आवश्यकच होते.कारण माझे वडील त्या संस्थेच्या हायस्कूलम्ध्येच शिक्षक होते.हायस्कूल हे मुला मुलींसाठी एकच असल्याने आम्ही काही मुले व काही मुली या
हायस्कूलच्या सातव्या वर्गात गेलो  तर काही मुले व मुली लोकलबोर्डाच्या शाळेतच
राहिली ,त्यामुळे आमच्या वर्गात एकदम  १४ मुली आल्या.त्याना आमचे दादा १४ रत्ने असेच म्हणत. हायस्कूलच्या इमारतीत ८ वी ते ११ वी अश्या चारच वर्गांची बसण्याची सोय होती म्हणजे चारच वर्ग होते त्यामुळ या नव्या वर्गाची सोय त्याच इमारतीच्या समोरील देवस्थानच्याच जुन्या इमारतीत करण्यात आली.ती इमारत बरेच दिवस वापरात नव्हती ती या निमित्ताने वापरात आली.आमचा वर्ग रस्त्याच्या बाजूकडील खोलीत भरे व मागील बाजूस थोडी मोकळी जागा व सभोवती छप्पर असलेली जागा होती त्या जागेचाही उपयोग करण्यात आला व आमची प्रार्थना तेथे करण्यात आली व त्यानंतर दादा दररोजच्या वृत्तपत्रातील बातम्यांचे सार सांगत.त्यावर सामान्य ज्ञान अश्या विषयाची  परीक्षा पण ठेवण्यात आली.
     सातवीत आम्ही असताना श्री.करंदीकर या नावाचे मुख्याध्यापक आम्हाला लाभले. करंदीकर.हे फार उत्साही व हुशारही.आम्हाला एकदोन वेळा भूगोल शिकवायला ते आले तर कोणत्याही देशाचा म्हणजे अगदी नॉर्वे, स्वीडन, पोर्तुगाल अश्या देशाचा नकाशाही  ते फळ्यावर खडू टेकवला आणि एका बिंदूपासून सुरवात केली की पूर्ण नकाशा त्या बिंदूपर्यंत आणूनच ते खडू उचलायचे.आणि उत्साही इतके की सहली,किंवा नवे उपक्रम हिरीरीने राबवायचे. त्याना दोन मुले उत्तम हा मुलगा त्याला ते बेस्ट असे म्हणत तर निर्मला या मुलीला क्लीन असे म्हणत.
   . त्यावर्षी त्यानी बरेच उपक्रम राबवले.बातम्यांचा तास हा बहुधा त्यांच्याच डोक्यातून निघालेला उपक्रम होता. त्याशिवाय एक शिबिरही त्यानी घेतले.महाराजाच्या मालकीचा एक मळा गावाबाहेर होता त्या मळ्याला सरकारी मळा असे म्हणायचे.या मळ्य़ात एक आठवडा मुलानी जाऊन रहायचे.त्या कालात त्यानी स्वत:ची कामे स्वत:च करायची.दररोज सकाळी त्यानी शिकवलेली प्रार्थना त्यानंतर कवायत,त्यानंतर काही श्रमदान. त्यातील एक प्रार्थना फार गोड सुरात ते आम्हाला म्हणायला सांगत ." किशन घर नंदके आये दुलारा हो तो ऐसा हो" अशी ती होती.रात्री मळ्यातल्या बंगल्यातील खोल्यातच मुलानी निरनिराळ्या तुकड्या करून रहायचे.झोपण्यापुर्वी शेकोटी करून त्याभोवती कडे करून गाणी वगैरे म्हणायची. रात्री आळीपाळीने मुलांनीच चौकीदाराचे काम करायचे असा मोठा शिस्तबद्ध कार्यक्रम तो होता. त्यानी शाळेच्या कचेरीसमोर एक मोठा काचेच्या झाकणाचा सूचनाफलक लावून त्यात वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देणे सुरू केले.ते पुढे राहिले असते तर शाळा व आम्हा मुलांचीही चांगलीच प्रगती झाली असती.
      आमचा सातवीचा वर्ग खास ट्रेनिंग कॉलेजच्या शिक्षकांना पाठ घेण्यासाठीच काढलेला असल्याने बरेच विद्यार्थी शिक्षक आमच्यावर पाठ घ्यायला येत.त्यात एक पूर्ण आठवडा एक शिक्षक वर्ग हाताळीत ते शिक्षक शेजवळ मास्तर होते.त्या सात दिवसाच्या शेवटी त्यानी आमच्या सर्व विद्यार्थ्यांची नावे गुंफून एक कविता केली होती त्यातील पहिली ओळ "हे शाम कुलकर्णी ,घार्गे यादव रणदीवे रा.ना.यादव पिसे पानसरे सुरेश झेंडे "अशी होती.त्यामुळे माझ्यापुढे एक इयत्ता असणारा पण घरगुती संबंध असल्यामुळे ज्याच्या घरी नेहमी जाणे येणे असे त्या माधव देसाईचे वडील मला पाहिल्यावर एकदम;"हे श्याम कुलकर्णी"अशीच सुरवात करत.
     याच शेजवळ मास्तरांची आणखी एक मजेशीर आठवण म्हणजे महात्मा गांधींच्या आत्मकथेच्या मराठी अनुवादातील एक धडा त्यावेळी मराठीच्या पाठ्यपुस्तकात होता.तो शिकवताना त्यात "बापूंना बा म्हणाल्या "असे वाक्य होते त्याचा अर्थ शेजवळ गुरुजींनी "बापूना त्यांचा बाप म्हणाला " असा सांगितला त्यावर मला काही राहवेना आणि उठून मी म्हणालो, "अहो गुरुजी बा म्हणजे बाप नाही.कस्तुरबांना 'बा' असे म्हटले आहे" असे मी सांगितल्यावर त्यानी ते मान्य न करता "चूप राहा अरे बा म्हण्जे बाप" असे सांगून मलाच चुप केले. 
          सातवीतच जरी आम्ही हायस्कूलच्या इमारतीत बसायला सुरवात केली तरी हायस्कूलमध्ये गेलो ते सातवीचा निकाल लागल्यावर आठवीत गेल्यावर. पण त्या दिवसांच्या आठवणी पुढे कधीतरी !