हजारो कविता या इथे

हजारो कविता या इथे
आंतरजालावरील महासागरात
रोज रोज पडत असतात
काही सुमार असतात
काही अफाट असतात
कधी यमक वृतात
कधी मुक्त छंदात
आपल्या अस्तित्वासाठी
धडपडत असतात
या गतिमान प्रवाहात
जेव्हा मी सोडतो
माझ्या कवितेची
कागदी होडी
तेव्हा मला माहित असते
ती थोडावेळ तरंगणार
हेलकावे खाणार
अन अखेरीस वाहून जाणार
इतर हजारो कवितेगत
मन क्षणभर दु:खी होते
पण लगेच लक्षात येते
या होडीला वा त्या होडीला
अर्थ नाही कशाला
महत्व आहे ते फक्त
होडी सोडण्याला
ती वाहणारी हलणारी
अन हळूच बुडणारी
होडी पाहण्यात
जो आनंद असतो
तोच कवितेचे कारण
आणि परिमाण असतो

विक्रांत प्रभाकर
दुवा क्र. १