झोप रात्रीस आजकाल कुठे?

गझल
वृत्त: लज्जिता
लगावली: गालगा/गालगा/लगागागा
किंवा
गालागा/गालगा/लगाललगा
************************************************

झोप रात्रीस आजकाल कुठे?
पांघराया तुझी दुशाल कुठे?

शोधतो सूर्यही उजेडाला....
काळजाची तुझ्या मशाल कुठे?

पाहुनी रागरंग वाटांचा;
मीच केली न वाटचाल कुठे!

आसवे पेटलीच हट्टाला!
तो गुलाबी तुझा रुमाल कुठे?

बोलती स्पर्श! बोलती डोळे!
प्रेम म्हटल्यावरी सवाल कुठे?

वर्ष निवृत्त होउनी झाले!
फायलींची न हालचाल कुठे!!

जाहले वर्षश्राद्धही माझे!
जिंदगीने दिला निकाल कुठे?

ही कशाची अरे, विजययात्रा?
नाचगाणी कुठे? गुलाल कुठे?

वीष प्यालो मजेत दुनियेचे!
वाटले तेवढे जहाल कुठे?

राहिले घर पडून ते माझे....
ते विकावे असा खयाल कुठे?

देश घ्या कोणता युरोपाचा;
आपल्या एवढा बकाल कुठे?

गद्य आयुष्य वाटते आहे!
सूर कुठला, कळे न ताल कुठे?

दाद द्यावीस जगा तू मजला;
मन तुझे एवढे विशाल कुठे!

मी मनाचाच माझिया राजा!
हे विचारू नका....महाल कुठे?

संगणकपर्व हे सुरू झाले!
वाट बघणे कुठे? टपाल कुठे?

फक्त मालक म्हणायचे मजला!
माझिया कनवटीस माल कुठे?

ती खळी, ते हसू कुठे नाही!
शेर व्हावा असाच गाल कुठे?

मेघ आले रित्याच हातांनी....
पाहते ही धरा...पखाल कुठे?

हे न माझे भविष्य तू वदतो!
एवढे भाग्यवंत भाल कुठे?

मी खुला, लाटण्यासही सोपा!
मात्र मजला उद्या विकाल कुठे?
    
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१