कधी बुडालो, कुठे कुणी ऐकला पुकारा?

गझल
वृत्त: सती जलौघवेगा
लगावली: लगालगागा/लगालगागा/लगालगागा
************************************************

कधी बुडालो, कुठे कुणी ऐकला पुकारा?
अता मला हाक मारतो हा पहा किनारा!

किती मला हौस विस्तवाशीच खेळण्याची!
अजून हातामधेच माझ्या अरे, निखारा!!

अजूनही पावसातली मौज आठवे ती....
अजून हृदयात गोठलेल्या तशाच गारा!

नभास नाही फिकीर पण, ही धराच साक्षी!
गळून पडतो अलीकडे रोज एक तारा!!

असेल जर शीड फाटके, नादुरुस्त वल्ही;
अशा प्रसंगी करेल तो काय, सांग वारा?

असेल छोटे, तुला रहायास घर तरी ते....
स्वत:च वारा, मला अरे, कोणता निवारा?

कितीकदा आसपास मृत्यू असेल आला!
अजून होता तसाच माझा असे पसारा!!

समोर साक्षात वाटते नादब्रम्ह ठाके!
हरेक गाणे तनूवरी आणते शहारा!!

स्वभाव मिष्किल, विनोदबुद्धी, प्रसन्न चर्या!
प्रसन्नतेचा जणू सुगंधी असे फवारा!!

बनून निर्भय जगावयाची मजाच न्यारी!
भयास देऊ नये कधीही मनात थारा!!

असेच एकेक फळ कुणी लाटले खुबीने!
कसाबसा मी अखेर माझा दिला उतारा!!

कशी तिच्या लोचनातली मी पिणार मदिरा?
सदैव तेथेच पापण्यांचा खडा पहारा!

निभाव लागेल कोण जाणे कसा तयाचा?
गनीम सारे, गरीब तो एकटा बिचारा!

हरेक व्यक्तीस काय खुश ठेवणार तुम्ही?
नसेल जर गोष्ट मान्य तर ती सरळ नकारा!

हवा कशाला अहंपणा जो नसे हिताचा!
समर्थने द्यायच्या परी त्या चुका  सुधारा!!

कमीपणा त्यात कोणता? गैर त्यात नाही!
जरूर उघडून तोंड अडते तिथे विचारा!!

हवा कशाला अमाप पैसा....सदा प्रसिद्धी?
स्वत:हुनी जोखडे अशी नेहमी झुगारा!

मनात इच्छा हवी, उभारी जरूर येते!
धरेवरी रोवुनी पाय या नभी भरारा!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१