जन्माच्या वरदानाला किंचितही वरपण नाही!

गझल
वृत्त:?
लगावली: गागागा/गागागागा/गागागा/गागागागा
******************************************

जन्माच्या वरदानाला किंचितही वरपण नाही!
जगण्याची इच्छा आहे, श्वासांचे सरपण नाही!!

आयुष्याच्या होमाची कुचराई ना केलेली....
हे होमहवन करुनीही आत्म्याला तर्पण नाही!

भक्तीचा वावर नाही, देवाचा जागर नाही!
घर भरलेले पैशाने, पण त्याला घरपण नाही!!

प्रतिमाही माझी मजला का परिचित वाटत नाही?
ही चर्या धुरकटलेली, की, निर्मळ दर्पण नाही?

धर्माने वागत आलो, नेमाने कर्मे केली!
लक्षातच आले नाही...फळ केले अर्पण नाही!!
              
 .........प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१