फार तोलून मनातील जगाशी बोला!

झल
वृत्त: ?
लगावली: गालगागाल/लगागाल/लगागागागा
*************************************************

फार तोलून मनातील जगाशी बोला!
मात्र आधी सगळी बात स्वत:शी बोला!!

कोण माणूस कसा ते पहिल्यांदा ताडा....
भान ठेवून, नियोजून कुणाशी बोला!

हाय एकांतच जेव्हा उठतो भांडाया....
आपल्याशी घर बोलेल...घराशी बोला!

खूप उद्विग्न छळाने धरणीच्या होता;
आपले दु:ख उरातील, नभाशी बोला!

लागली फार फुशारू किरणे सूर्याची....
यार मानून तमालाच, तमाशी बोला!

का  स्वत:शीच स्वत: वैर फुकाचे घ्यावे?
शांत होऊन मनातील मनाशी बोला!
             
  .........प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१