समुद्रासही त्रास देते पिपासा!

गझल
वृत्त: भुजंगप्रयात
लगावली: लगागा/लगागा/लगागा/लगागा
**************************************************

समुद्रासही त्रास देते पिपासा!
नदी काय देणार त्याला दिलासा?

जराशी कमी गोड ही जिंदगानी....
तुझा गोडवा दे मलाही जरासा!

नवे दु:ख इतक्यात देऊ नये तू!
अताशा कुठे टाकतो मी उसासा!!

तुझ्या लोचनी कूट कित्येक कोडी!
तुझा रेशमी स्पर्श वाटे खुलासा!!

तुझा हासरा चेहरा सोबती दे....
निघालो अता दूरच्या मी प्रवासा!

जगाला सुधारायचा सोस सोडा....
स्वत:ला निहाळा, स्वत:ला तपासा!

कुठे मागतो फार जागा तुला मी?
पुरे अंतरातील कोना निवासा!

पुन्हा जाग तृष्णेस आली धरेच्या...
पुन्हा मेघ आला नभी सावळासा!

जरी नोकरीतून निवृत्त झालो;
तरीही न वाटे मला मी सडासा!

सुगंधात अभ्यंग घर नाहले हे!
कुणी टाकला अंगणी हा सडासा?

भलाई, बुराई मलाही समजते!
कळे कोण लुच्चा, लफंगा, भलासा!!

कृपा ही तुझी, अन् अहोभाग्य माझे!
तुझ्या मी समुद्रातला देवमासा!!

पितळ ते पितळ...काय होणार सोने?
कितीही धुवा वा किती त्यास घासा!

कसा कोण बसवेल खुर्चीत मोठ्या?
दिसायास मी हा असा फाटकासा!

अती ताण सोसून झालो कसा मी?
पहा खिळखिळा, सैल अन् मी ढिलासा!

तशी मूर्त माझी असे वामनाची!
समजतात सारे मला धाकटासा!!

हिशोबामधे वागलो मी न केव्हा!
न स्मरतो कधी जाहलेला नफासा!!

मनातील मालिन्य झाकेल का ते?
भले चेहऱ्यावर किती रंग फासा!

तुझ्या वेदनांचा लळा केवढा हा!
मला वाटतो शूळही हा हवासा!!
               
 .........प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१