मी न जगतोच माझियासाठी!

गझल
वृत्त: लज्जिता
लगावली: गालगा/गालगा/लगागागा
****************************************

मी न जगतोच माझियासाठी!
जिंदगी जाळतो जगासाठी!!

वृद्ध होऊ दिले न मी मजला....
धावतो आजही मुलासाठी!

शायरी वाटते जगाला ही....
बोलतो सर्व मी तुझ्यासाठी!

मूक राहून सर्व बोलू या...
हे तुझ्या माझिया भल्यासाठी!

हात मी सोडला सुगंधाचा....
आडरानातल्या फुलासाठी!

सर्व आनंद वाटुनी झाला!
दु:ख मी ठेवले स्वत:साठी!!

आसवे फक्त धावुनी आली...
आसवांच्याच सांत्वनासाठी!

तो झळाळेल....तो हिरा आहे!
तो न थांबेल कोंदणासाठी!!

कुरबुरी, भांडणे किती होती!
मीच उपयुक्त वंगणासाठी!

कोण सांगेल नीट मेघांना?
ही धरा खिन्न पावसाठी!

हा न पाया....असे कबर माझी!
बांधली घर उभारण्यासाठी!!

वाकडी वाट कोण करतो का?
लोक येतात कारणासाठी!

नाव येतेच, मी जरी नसलो!
ते पुरे त्यांस भांडणासाठी!!

का प्रदर्शन करू तुझे दु:खा?
लोक जमलेत हासण्यासाठी!

रक्त माझे अमूल्य आहे हे....
ते न जळवांस पोसण्यासाठी!

आजही वाटचाल ही चालू....
पाय नाहीत चालण्यासाठी!

चंद्र, तारे तिला नको होते....
मी दिली प्रीत माळण्यासाठी!

दे मला तो तुझा सुईदोरा!
या नभालाच टाचण्यासाठी!!

.........प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१