एकेक श्वास माझा केला तुझ्या हवाली!

गझल
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा
**************************************************

एकेक श्वास माझा केला तुझ्या हवाली!
आता खरी जिण्याची माझ्या पहाट झाली!!

हे शीड फाटलेले अन् मोडके सुकाणू....
या गलबतास आता नाही कुणीच वाली!

सोडून प्राण गेले....मन राहिलेच मागे!
डोळ्यांसमोर त्याच्या त्याची चिता जळाली!!

विजयास माझिया ना आले कधी मिरवता....
माझ्या पराजयाची पण, धिंड बघ निघाली!

डोळ्यांत प्राण आले करता तुझी प्रतीक्षा;
आली झुळक पहाटे पण, एकटीच आली!

असशील सूर्यही तू, करणार ते न पर्वा;
पायात जोम त्यांच्या, हातांमधे मशाली!

मतदार रोड झाले अन् जाडजूड नेते!
पोटाळ एवढे की, ते भासती पखाली!!

आश्चर्य काय आहे? का हळहळेल दुनिया?
आलो जसा अकाली, गेलो तसा अकाली!

मी एकमेव साक्षी माझ्या फसवणुकीचा!
डोळ्यांसमोर माझ्या घडल्यात हालचाली!!

गुपिते तुझ्या मनाची निमिषात जाणली मी!
करते चहाडखोरी गालावरील लाली!!

चुकतात काळजाचे काही मधेच ठोके!
तू पाहतेस जेव्हा मजला हसून गाली!!

अद्याप काय उरले आहे बघावयाचे?
मज सांग ईश्वरा तू... लिहिलेस काय भाली?

म्हणुनीच काळजी मी घेतो अता स्वत:ची;
दिसतात संतसज्जन पण, असतात ते मवाली!

इतकीच फक्त किंमत या शायरीस आली....
श्रीफळ कुणी दिले तर कोणी दिल्यात शाली!

उरलेत श्वास त्यांनी केला मला इशारा....
आता निघावयाची घटिका समीप आली!

आहे मला मुखोद्गत आलेख जीवनाचा!
प्रत्येक गोष्ट स्मरते घडली कितीक साली!!

बघ पेंगतात रस्ते, थकल्यात पायवाटा....
तूही विसाव थोडे, बघ वेळ काय झाली?

हेही न थोडके की, येती मधून पत्रे!
पत्रातुनीच मुलगा पुसतो तरी खुशाली!!

 .........प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१