एरव्ही शिवराळ सगळ्यांचीच वाणी!

गझल
वृत्त: मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
*************************************

एरव्ही शिवराळ सगळ्यांचीच वाणी!
फक्त झेंडावंदनाला देशगाणी!!

हाच का तो देश, जो आझाद झाला?
राहिली कोठे हुतात्म्यांची निशाणी?

चेहरे बदलून ते निवडून आले!
लोकशाहीची दशा बघ दीनवाणी!!

तो वडा अन् पाव सुद्धा स्वस्त कोठे?
कोठुनी आणू तुला सिलबंद पाणी?

कैक कोटी बेहिशोबी जप्त केले!
काय पैशांच्या कुठे असतात खाणी?

जन्मलो, जगलो, तसा चुपचाप मेलो......
काय मी सांगू तुला माझी कहाणी?

संकुले, अन् मॉल, मल्टीप्लेक्स झाली!
काल परवा चाळ होती या ठिकाणी!!

आज ऎटम सॉंगचा आहे जमाना!
मी कशाला आळवू माझी विराणी?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१