कोण वाचू, कोण चाळू लागले!

गझल
वृत्त: मेनका
लगावली: गालगागा/गालगागा/गालगा
****************************************

कोण वाचू, कोण चाळू लागले!
शेवटी मज लोक टाळू लागले!!

काय मुलखावेगळा मी वाटतो?
का मला हे जग निहाळू लागले?

रानफूलाच्या घराण्यातील मी....
का मला ते आज माळू लागले?

जिंदगीचे घोंगडे ओलेचिले....
जिंदगी सरताच वाळू लागले!

पाहिली ये जा न श्वासांची कुणी!
प्रेत ते समजून जाळू लागले!!

कोरडी होती जगाची लोचने....
आसवे, ते प्रेत ढाळू लागले!

फैसला जनता कराया लागली....
लोकनेते शब्द पाळू लागले!

ते मला वगळायचे केव्हा तरी....
आज ते सर्रास गाळू लागले!

वाटलो काटा जगाला मी जरी;
माझियावर फूल भाळू लागले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१