नाही चांदणे नभात....

अवसेची रात नाही  चांदणे नभात
हरवलेल्या चांद राती दाटल्या मनात.....

मंद वाहे पवन झोपलीत पाखरे
अंतरीच्या नभी दुःख का पाझरे?
का मनाला जाळते आता विराणं रात...
हरवलेल्या चांद राती दाटल्या मनात...

ओळखीचे मला ते गीत वाटते
सूर उदास तेथे कोण छेडते
का फिरुनी दुःख माझ्या दाटते उरात....
हरवलेल्या चांद राती दाटल्या मनात...