बोल तू सारे उद्या, पण, आज नाही!

गझल
वृत्त: मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
************************************
बोल तू सारे उद्या, पण, आज नाही!
आज माझाही मला अंदाज नाही!!

वेदनांनो! बंद नाही दार माझे;
आज मी तुमच्यावरी नाराज नाही!

वाटला मजला न हेवा चेहऱ्यांचा;
कोणताही चेहरा निर्व्याज नाही!

शब्द आत्म्याचाच माझ्या सूर आहे;
हा कुणाचा बेगडी स्वरसाज नाही!

मी जरी आटापिटा केला जिवाचा;
फेडता आले तुझे मज व्याज नाही!

तो दगा निष्पाप...तो निष्पाप कावा...
वाटले कोणीच कावेबाज नाही!

ऎकण्यासाठी जिवाचे कान केले!
पाहिजे तो नेमका आवाज नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१