काळजात बिनजखमांचा कोपरा राहिला नाही!

गझल
वृत्त:मात्रावृत्त
(१४+१४=२८मात्रा)
*****************************

काळजात बिनजखमांचा कोपरा राहिला नाही!
स्वप्नांना रात्री पुरता आसरा राहिला नाही!!

एकेक वीट वाड्याची वेगळी वेगळी झाली;
कोणीच कुणाचा आता सोयरा राहिला नाही!

खेळलो ह्याच गावाच्या मी अंगाखांद्यावरती,
अन् मलाच घर बांधाया कोपरा राहिला नाही!

बाहेर चार भिंतींच्या काटली जिंदगी आम्ही;
शाबूत घराचा जेव्हा चौथरा राहिला नाही!

आभाळ उतरले खाली दाराशी, खिडकीपाशी;
पिंजरा घराचा आता पिंजरा राहिला नाही!

लागले मिळाया सहजी, चांदणे माळण्यासाठी;
वेणीत कुणाच्या आता मोगरा राहिला नाही!

गेलेल्या आयुष्याने पाडल्या सुरकुत्या इतक्या,
उरलेल्या आयुष्याला चेहरा राहिला नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१