शोध

कधी वरून दिसतो खूपच साधा भोळा ..

   पण आतून असतो पुरता काळा काळा ..

 चेहेऱ्यावर कधी ते दिसती हास्यतुषार ..

   पण मनात केवळ द्वेषाचे फुत्कार ..

  शान्त राहूनी कधी परतवतो वार ..

     पण अंतर्यामी  क्रोधाचे आगार ..

  क्षण आनंदाचे कधी पसरवून देतो ..

     पण खोल कुठेतरी खचलेला मी असतो ..

  वर दाखवितो मी सगळ्यातून विरक्ती ..

     पण अजून आहे जगण्यातील आसक्ती ..

  मी सगळी रूपे माझीच दुरूनी पाहे ..

    मी खरा कोणता हा शोध निरंतर आहे ..