तारांगण आकाशाचे उतरले तिच्या पदरावर!

गझल
वृत्त: मात्रा वृत्त
मात्रा:२८(१४+१४)
**************************************************

तारांगण आकाशाचे उतरले तिच्या पदरावर!
तो चंद्र नभीचा सुद्धा भाळला तिच्या मुखड्यावर!!

ऐवजी फुलांच्या माळे वेणीत जणू ती तारे!
साक्षात चांदणे निथळे, ती जाते त्या रस्त्यावर!!

नजरेत शिगोशिग भरली चंद्राची कोमल किरणे......
ती नव्हे, खुद्द वावरते पौर्णिमाच पृथ्वितलावर!

नभ म्हणते की, धरणीवर हर रात्र कशी पुनवेची?
तो चंद्र नभीचा जळतो धरणीच्या या चंद्रावर!

उरला न फरक आताशा धरणी अन् गगनामध्ये!
प्रतिबिंब धरेचे दिसते बघ, पडलेले गगनावर!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१