काळजाला माझिया पडली किती होती घरे!

गझल
वृत्त: देवप्रिया
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा
**************************************

काळजाला माझिया पडली किती होती घरे!
आरशाला फक्त माझे मोजता आले चरे!!

ह्याच मी गावात माझा जन्म सारा काढला;
शोधतो येथेच आता ओळखीचे चेहरे!

काय तू गेलीस करुनी प्रश्न डोळ्यांनी मला?
तोकडे आयुष्य पडले शोधताना उत्तरे!

मी घडी घालून कोठे ठेविली चिठ्ठी तुझी?
शोधले मी काळजाचे सर्व कानेकोपरे!

मी मनाचे माझिया केले उभे बुजगावणे;
त्रास देऊ लागली जेव्हा स्मृतींची पाखरे!

मृगजळांना मी कधी देणार नाही दूषणे;
फसवुनी गेले मला माझेच डोळे हे खरे!

वेदनेच्याही बिछान्यावर सुखाने झोपतो;
आज स्वप्नांचीच घेतो पांघराया लक्तरे!

हे कुणाचे चांदणे पडले मनाच्या अंगणी?
आज शब्दातून माझ्या पौर्णिमा का पाझरे?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१