आहे तुझ्याचसाठी एकेक श्वास माझा!

गझल
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागालगा/लगागा/गगालगा/लगागा
***********************************************

आहे तुझ्याचसाठी एकेक श्वास माझा!
आता तुझ्या फुलांना येई सुवास माझा!!

टाळूनही मला तू जाणार सांग कोठे?
जाशील त्या ठिकाणी होईल भास माझा!

केव्हा फुलात, केव्हा काट्यात राहिलो मी;
लागू दिला न मीही वारा कुणास माझा!

मी ठेवले घराचे उघडेच दार तेव्हा,
चुकशील वाट तूही होता कयास माझा!

आहेस तू इथेही, आहेस तू तिथेही;
एकेक, काळजाचा, कोना तपास माझा!

मी का म्हणून माळू गझलेत नाव माझे?
सांगेल सर्व काही हा बाज खास माझा!

आजन्म चाललो अन् आले न गाव माझे;
पायाविनाच आता चाले प्रवास माझा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१