हृदयाच्या तारा आता कोणीही छेडत नाही!

    गझल
वृत्त: मात्रावृत्त
मात्रा: २८(१४+१४)
*****************************************

हृदयाच्या तारा आता कोणीही छेडत नाही!
कुठलीच ओळ माझ्याही ओठांवर घोळत नाही!!

तो वणवा धर्मांधंचा....त्या चिता देशप्रेमाच्या......
काळीज कसे कोणाचे आताशा पोळत नाही?

जाळते किती आम्हाला निष्ठूरपणाने गरिबी!
धुमसती चिताही इतके प्रेताला जाळत नाही!!

इतिहासजमा झालेले मी पान वर्तमानाचे.....
वाचणे दूर, मज कोणी वरवरही चाळत नाही!

चालला फुलांनो तुमचा गंधोत्सव कोणासाठी?
रंगावर भुलते, दुनिया गंधावर भाळत नाही!

ते शहर फुलांचे होते पण, फुले कागदी होती!
कागदी फुलांना कोणी कुंतलात माळत नाही!!

आसवे उभ्या जन्माची डोळ्यांतच तरळत बसली!
जातील कुठे ती? त्यांना कोणी सांभाळत नाही!!

कळतात अंतरे मजला या नात्यागोत्यांमधली!
मी कुणास टाळत नाही, किंवा कवटाळत नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१