कधी नेमके झाड बहरले, कळले नाही!

गझल
वृत्त: मात्रावृत्त
मात्रा: १६+०८=२४ मात्रा
****************************************

कधी नेमके झाड बहरले, कळले नाही!
पानगळीचे पाय वाजले, कळले नाही!!

त्या गंधाने ओढत नेले, वेडे केले!
कुठे फुलांचे गाव संपले, कळले नाही!

तुझ्या फुलांच्या शोधामध्ये जन्म संपला;
गंध तुझे चौफेर कोंदले, कळले नाही!

बालवयासारखे रांगते वय म्हातारे;
यौवन केव्हा आले, सरले, कळले नाही!

दौलत माझ्या अस्तित्वाची उधळत गेलो;
काय खरचले, काय मिळवले, कळले नाही!

हात दिशांना देणाऱ्याने मिटले डोळे;
कुठे दिशांचे जमाव वळले, कळले नाही!

सूर्यालाही चुकली नाही घरघर त्याची....
कधी ग्रहांनी त्यास ग्रासले, कळले नाही!

न हुंदका, आसवे, उसासे, न एक टाहो!
कधी उरातील स्वप्न जळले, कळले नाही!

कधी कळ्यांनी, कधी फुलांनी प्रहार केले;
कुणी कुणी या जिवास छळले, कळले नाही!

अजून का तेवतात डोळे कलेवराचे?
प्रहर तुझ्या येण्याचे टळले, कळले नाही!

   ............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१