ललिता पंचरत्नस्तोत्राचे समश्लोकी भाषांतर

जिचे मुखकमळ सूर्यबिम्बासमान

नासाग्री मोत्यांची नथ शोभिमान

कानी कुंडल सुंदर दीर्घ लोचन

कस्तुरीतिलका हसे मंद छान  !!१!!

अशी ती ललिता भजे मी सकाळी

मृदू लाल बोटे अन कर कल्पवल्ली

तिचे कर मणी सोनियांच्या कड्यांचे

उस चाप सुम बाण पाशांकुश त्याते !!२!!

पहाटेस नमितो तिची पादकमळे

भवसिंधुतारी मनोरूप फळते

ब्रह्मेंद्र आदी जिला नित्य भजती

पंकज ध्वज अंकुश सुदर्शन करा ती !!३!!

परम मंगला ती भवानी स्तुवावी

महिमा ज्या करुणेचा वेदान्तगावी

जिचा खेळ उत्पत्ती स्थिती लय स्वभावी

ती विद्येश्वरी वाणी वेदा न ठावी !!४!!

प्रभाती ललिते तुझी पुण्य नामे

कामेश्वरी कमला माहेश्वरी नि

वागीश्वरी शाम्भवी विश्वजननी

त्रिपुरेश्वरी श्री परा हि वदे मी !!५!!

असे स्तोत्र पहाटे ललितांबिकेचे

सौभाग्यदायी ललितपूर्ण साचे

म्हणे त्यास देई प्रसन्ना ललिता

विमलसुख अमलधन सुकीर्ती सद्विद्या !!६!!