सरोवर

सागर तो खारट म्हणुनी अपेय ठरे लोकांसी

तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे

तो तप तप तपला आणि आकाशी मेघ बनूनी

देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी

बरसून रिता होताना तो तोच सरोवर झाला

लोकांच्या नीववित तापां खर्चली ही जीवनवेला

पोसले किती वृक्षांना, तहानेस किती भागविले

किती पशूपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले

किती पांथस्थ, किती प्रेमी, किती त्रस्त जीव एकाकी

किती ऋतू बहरले ऋजुता पावूनी त्याच्या जीवनी

मग एक काळ ग्रीष्माचा सूर्याचा चढला पारा

असूयेने त्यास म्हणाला तुज गिळून टाकतो सारा

तो उंचावुनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला

लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला

काठावर आता तसले सोहळे कुठे होतील

तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील

कि ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा

पळतील चहूंस पशूही शोधून निवारा दुसरा

पण कधी तळ्याच्या हृदयी पाहूनी स्थान स्वतःचे

सर्वस्व तया मानूनी तो मीन बिचारा उरला

कि इतर तुझ्या स्मरणात जगतीलसुद्धा इतरत्र

पण पाण्याविण माशाला ठावही नसे जगतात

या निर्वाणिच्या समयी त्याने कोणास पाहावे

तुजसवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे