फुलराणीचा पाळणा ...

झुलवुनिया पाळणा, गाऊया गं गाणी
सजलेल्या ह्या पाळण्यात, निजते फुलराणी

आषाढाचे मेघ दाटता, भरले नवमास,
सानुली जणु परीच आली, दिवस पाहूनी खास
साखर वाटत फिरू लागला, बाबा अनवाणी

इंवले इंवले डोळे, न्याहाळती जग सारे,
तुला निजविण्या घालावे, किती गं येरझारे,
सानसुखाची आई तुजला सांगे कहाणी

लुटुलुटु पाउले टाकीत, धावेल धिटुकली
काऊचिऊच्या संगे, मंमं करेल चिमुकली
भातुकलीचे खेळ, रंगतील अपुल्या अंगणी

उंच उंच आकाशामध्ये, घेऊन भरारी,
विद्या कला संस्कारांनी भर तू तिजोरी,
ताऱ्यासम तू लखलखशील, ही असे देववाणी

जन्म बाईचा जरि सुखाचा, परि नसे हा सोपा,
धागा करुनी आतडीचां, लागे विणावा खोपा,
आई यमाई देईल तुजला बुद्धी शहाणी

- अनुबंध