मुखपृष्ठ फाटलेले! मलपृष्ठ फाटलेले!

गझल
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा
************************************************************

मुखपृष्ठ फाटलेले! मलपृष्ठ फाटलेले!
मी एक पाठ्यपुस्तक, धुळधाण जाहलेले!!

माझे मला कळेना, वाचू कसे मला मी?
प्रत्येक पान माझे इतके चितारलेले!

वाचू नये कुणाची दैनंदिनी कुणीही;
असतात वेदनांचे आलेख काढलेले!

डोळे भरू न देता आम्ही रडून घेवू;
दिसतील सर्व अश्रू हृदयात सांडलेले!

ती आग लागलेली समजूतदार होती;
दिसले कुणास नाही काळीज पोळलेले!

शिक्षा मला मिळाली परडीत राहण्याची;
मी एक फूल होतो; चोरून तोडलेले!

केली कुणी न परवा माझ्या विटंबनेची;
मी वृत्तपत्र होतो वाचून जाहलेले!
   
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१