तरूतळी त्या काल पाहिले ऊन्ह एकटे बसलेले!

आमचे खूप जुने स्नेही व गुरुतुल्य गझलकार आदरणीय श्री. इलाही जमादार यांची एक नाजूक उर्दू गझल देत आहोत.
त्यांच्या गझलेची नजाकत मराठीत आणण्याचे एक धाडस केले आहे, गझलेवरील प्रेमापोटी! त्यांच्या गझलेचा आम्ही केलेला भावनुवाद सोबत देत आहोत! पहा आम्ही कितपत यशस्वी झालो या भावानुवादात ते! आपली प्रांजळ मते जरूर जरूर कळवा,वाचायला आवडतील ज्यामुळे आम्हांस आमचे काव्यचिंतनही तपासून घ्यायला मोलाची मदत मिळेल!
अनुवादाची प्रेरणा कवयित्री, गझलकार व गझलसमीक्षक सुनेत्रा नकाते यांच्याकडून मिळाली!
मूळ उर्दू गझल खालीलप्रमाणे............
 
     
     
तनहाई (ग़ज़ल) - शायर- इलाही जमादार
गुफ़्तगू - प्रथम संस्करण १५ जून २००७

देखा पेड़ के साये में कोई धूप अकेली बैठी थी
बस शोर मचा था किरणों का बाकी सब ख़ामोशी थी

(संपादित. मनोगतावर लिहिताना इतरभाषिक मजकूर कुठल्याही कारणाने १०% च्या वर जाणार नाही ह्याची कृपया खबरदारी घ्यावी.
योग्य वाटत असल्यास असा इतरभाषिक मजकूर जालावर इतरत्र ठेवून त्याचा दुवा आपल्या लेखनात द्यावा. कळावे. : प्रशासक)

****************************************************
वरील गझलेचा भावानुवाद खालीलप्रमाणे.............
गझल
वृत्त: मात्रा वृत्त
मात्रा: ८+८+८+६=३०मात्रा
**************************************************

तरूतळी त्या काल पाहिले ऊन्ह एकटे बसलेले!
किरणांची तेवढीच गजबज, निवांत जग पण, उरलेले!!

दूरदूरवर अथांग सागर, फक्त राज्य त्या पाण्याचे......
नसे नाव, ना कुठे किनारा, सारे सारे दडलेले!

मृगजळातही विलसत होत्या चंद्रचांदण्यांच्या प्रतिमा!
मरुभूमीतच जणू कुणाचे स्मरण असावे झरलेले!!

मरुभूमीच्या दिव्यप्रदेशी एक दिवाणा वणवणतो.......
क्षणाक्षणांचे फूल उमलले, श्वास श्वास घमघमलेले!

सूर्याच्या सावलीत बसली छाया कोणी एकाकी!
जरा निरखले.....ते तर माझे...... एकाकीपण थकलेले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१