वणवणण्यामध्ये माझे आयुष्य उभे हे गेले.....

गझल
वृत्त: मात्रा वृत्त
मात्रा: १४+१४=२८
**************************************************

वणवणण्यामध्ये माझे आयुष्य उभे हे गेले.....
मी जात राहिलो जिकडे नशिबाने मजला नेले!

मी निमूट भोगत गेलो, जे भोग कपाळी आले.....
तक्रार कुठे ना केली, ना भांडण कुठले केले!

मी नव्हतो दिसावयाला सुस्वरूप...कबूल आहे!
पण, कुरूप झालो पिउनी मी विटंबनांचे पेले!!

ते झाड बहरले आहे, निष्पर्ण काल जे होते!
पण, नशीब खडतर त्याचे....बघ फूल फूल खुडलेले!!

वय उतार माझे झुकले, नजरही क्षीण झालेली!
गरिबीत बालवय गेले....मस्तीत तरुणपण गेले!!

जिंदगी विचारत आहे मज जाब उभ्या जन्माचा....
मज जिथे आठवत नाही, की, काल काय घडलेले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१