तुझ्या कृपेची किरणे कलली, दुनिया माझी धूसर झाली!

गझल
वृत्त: मात्रावृत्त
मात्रा: १६+१६=३२मात्रा
***************************************

तुझ्या कृपेची किरणे कलली, दुनिया माझी धूसर झाली!
हात तुझा सुटला अन् माझी वाट केवढी खडतर झाली!!

वाऱ्याचे पाऊल वाजले, की, हे पैंजण तुझे वाजले?
सळसळले खिडक्यांचे पडदे, मनामधेही थरथर झाली!

हीच माणसे माझ्यासाठी थांबायाला तयार होती;
आज हजेरी माझी, त्यांच्या वाटेमधली अडसर झाली!

कुठून आलो? कुठे थांबलो? कुठे जायचे, कुठे चाललो?
वाटचालही भरभर झाली, पिछेहाटही भरभर झाली!!

बरे जाहले, त्या स्वप्नांची मी न कधीही घडी मोडली;
आज माझिया कलेवराला झाकायाला चादर झाली!

माझ्या नावावरी यशाच्या दोन चार ज्या चिंध्या होत्या;
लुटणाऱ्यांनी त्याही लुटल्या, यशास त्यांच्या झालर झाली!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१