डॉक्टर....

डॉक्टर, माझ्या ह्रदयाच्या, तिच्या ह्रदयाशी जोडलेलं असण्यानं
अलिकडे श्वास घुसमटल्यासारखा वाटतो तिचा कधीकधी
म्हणून आलोय तुमच्याकडे
डॉक्टर, तुम्हाला जमेल कां हो
माझ्या ह्रदयापासून तिच्या ह्रदयाला वेगळं करणं ?
डॉक्टर, तुम्हाला जमेल कां हो
तिच्या ह्रदयात, माझ्या श्वासांहून वेगळा एक श्वास भरणं ?
डॉक्टर, शस्त्रक्रियेदरम्यान
माझ्या ह्रदयाच्या काही नसा कापल्या गेल्या तरी चालतील
नाही, त्या जाणारच आहेत, हे ठाऊकच आहे मला
पण तिच्या ह्रदयाला अजिबात त्रास होणार नाही असं काहीतरी करा
डॉक्टर, उतरली गुंगी मध्येच
तर नाही पहावणार वेदनेने माखलेले एकमेकांचे चेहरे,
म्हणून गुंगीचं औषध थोडं जास्तच भरा
डॉक्टर, जमलंच तर एखादी शीर तशीच ठेवा जोडलेली
उद्या लागलीच जर कधी गरज तिला
तर माझी सारी स्पंदनं तिच्या ह्रदयात संक्रमीत करता येतील

डॉक्टर, आणि हे काय ?
तुमच्या चेहर्यावर हळूहळू निराशेचं मळभ कां दाटतंय ?
की या गुंतलेल्या ह्रदयांना वेगळं करताच येणार नाही
हे कळल्यामुळे माझ्यासारखंच तुम्हालाही हरल्यासारखं वाटतंय ?