दूर कसा मी आलो इतका समजत नाही;

गझल
वृत्त: मात्रा वृत्त
मात्रा: १६+८=२४
************************************************

दूर कसा मी आलो इतका समजत नाही;
तुझी आठवण सुध्दा येथे फिरकत नाही!

हात तुझा सुटला अन् दोघे जागे झालो;
पहा तुलाही मी नसलो की, करमत नाही!

पाय असे दे, तुझ्याकडे नेतील मला जे;
नकोस देवू पंख हवे तर, हरकत नाही!

रक्ताचे पाणी केल्यावर मला समजले.....
रक्ताला पाण्याइतकीही किंमत नाही!!

सूट कशाला मृत्यूच्या वेदनेत मागू?
जगताना मी कधी घेतली सवलत नाही!

सोपे नाही टिकणे पेशामधे आमुच्या;
मिळतो मोठेपणा परंतू, मिळकत नाही!

------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१