शैली जगावयाची माझी तुझी निराळी!

गझल
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा
***************************************************

शैली जगावयाची माझी तुझी निराळी!
दिसती झळाच तुजला, मजला दिसे झळाळी!!

कवितेस लाभलेली कांती दिसून येते;
हृदयात आग जितकी, तितकी तिची झळाळी!

माझ्यामधून ऎसे खुडले तिने मला की,
हातात हात नव्हता; होती जणू डहाळी!

अंधार दूर इथला करतील लोक ऎसा.....
कोणी करेल होळी, कोणी तरी दिवाळी!

चिडचीड व्हायची ना माझी तुझ्याप्रमाणे;
तू सोसतोस अन् मी, स्वीकारतो टवाळी!

गेलो दिपून रात्री पाहून रोषणाई;
फसवेपणा कळाला मजला खरा सकाळी!

काळीज ओतले मी ओळीत एकएका;
बहरेल रोज माझ्या गझलेतली नव्हाळी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१