बांधले पायात मीही चाळ आता!

गझल
वृत्त: मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
*************************************************

बांधले पायात मीही चाळ आता!
घे तुला जे पाहिजे ते आळ आता!!

घ्या विड्या वेळीच शिलगावून तुमच्या;
पेटला माझ्या चितेचा जाळ आता!

वाच तासंतास मी नाही म्हणालो;
फावल्या वेळी तरी मज चाळ आता!

तू हवा, तुटक्या पतंगासारखा मी!
मी म्हणू कैसे मला सांभाळ आता!!

उंबऱ्याशी थांबला साक्षात मृत्यू;
जीवना, तू तोड माझी नाळ आता!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१