तरही गझल

तरही गझल
वृत्त: लज्जिता
लगावली: गालगा/गालगा/लगागागा
(मतल्यातील पहिली ओळ आदरणीय गझलकार सौ.संगीता जोशी यांची आहे)
***********************************************

दूर आकाश मोकळे होते!
पंख माझेच वेंधळे होते!!

दाद देणार ते कशी मजला?
पाहणारेच आंधळे होते!

कैद प्रत्येकजण पहा झाला.....
लाघवी सर्व सापळे होते!

रावणालाच राम म्हणती ते!
लोक भलतेच भोंगळे होते!!

भाव शब्दांत कैक भरलेले.....
अर्थ शेरांत वेगळे होते!

का क्षणांचे न यायचे पक्षी?
आठवांचे तुझ्या तळे होते!

प्रत्ययांचीच पेरली बीजे.....
शेर माझे जणू मळे होते!

कर्करोगामुळे घसे गेले....
गायकांचेच ते गळे होते!

घर लिलावामधे असे गेले.....
देखणे सर्व सोहळे होते!

ना फुका आवळे दिले त्यांनी;
काढुनी घेत कोहळे होते!

पाप धुतले किती शिताफीने!
नेसले लोक सोवळे होते!!

सोडला नाद मोठमोठ्यांनी.....
गझल साक्षात सोवळे होते!

छिन्नविच्छिन्न चेहरे होते!
मानवी फक्त कोथळे होते!!

लोक मखरात तेच बसलेले.....
जे मुळातून ठोकळे होते!

बोलल्यावर कळे....किती मोठे?
दर्शनी फक्त बावळे होते!

ते गळे कापतात केसाने.....
यार सारेच आगळे होते!

कल्पनाही न त्यांस जात्याची!
ते सुपातील जोंधळे होते!!

गझलक्षेत्रातला शिवाजी तो!
सर्व चेलेच मावळे होते!!

रंगसाधर्म्य फक्त ते होते!
कोकिळा दूर.....कावळे होते!!

दडवले अंतरात दोघांनी!
प्रेम अद्याप कोवळे होते!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१