अता फुलांचा सुगंधही मी दुरून घेतो!

गझल
वृत्त: सती जलौघवेगा
लगावली: लगालगागा/लगालगागा/लगालगागा
************************************

अता फुलांचा सुगंधही मी दुरून घेतो!
अलीकडे मी, ऋतू ऋतू पारखून घेतो!!

कशास मी आर्जवे करावी तुझी वसंता?
हरेक मी श्वास केवढा मोहरून घेतो!

असे नव्हे की, इजा व्यथांनीच फक्त केल्या;
सुखासही आजकाल मी पाखडून घेतो!

मला करावेच लागते वज्र काळजाचे;
हरेक माणूस आयुधे पाजळून घेतो!

नवीन नाही मला असे बेचिराख होणे;
अलीकडे रोज मी मला सावडून घेतो!

उगाच सोन्यासमान येते न ओळ ओठी;
मनात एकेक शब्द मी पालखून घेतो!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१