घ्यायला वेध लक्ष्याचा, मी सळसळतो केव्हाचा......

गझल
वृत्त: मात्रा वृत्त
मात्रा: १४+१४=२८
***********************************

   घ्यायला वेध लक्ष्याचा, मी सळसळतो केव्हाचा......  
 मी बाण तुझ्या भात्याचा, अन् तळमळतो केव्हाचा!

"आलेच लगोलग आले!" हे शब्द कसे विसरू मी?
निशिगंध तुझ्या शब्दांचा हा दरवळतो केव्हाचा!

उडणारच अंगावरती शिंतोडे काळोखाचे;
कंदील कधी म्हणतो का.... मी काजळतो केव्हाचा!

गेल्यावर मला समजले.....गेला तो श्रावण होता;
मी कडा उंच शिखराचा अन् हळहळतो केव्हाचा!

हा संधीप्रकाश आहे, पण प्रहर कोणता आहे?
हा माझा उदय म्हणू की, मी मावळतो केव्हाचा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१