पाहिले नाहीस की, तू पाहण्याचे टाळले?

गझल
वृत्त: देवप्रिया
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा
************************************************

पाहिले नाहीस की, तू पाहण्याचे टाळले?
मी तुझ्यासाठी उभे आयुष्य माझे जाळले!

मी तुझ्या डोळ्यांत, तू डोळ्यांत माझ्या पाहिले;
तेच तेव्हाचे बिलोरी स्वप्न मी कवटाळले!

सोडताना प्राण सुद्धा राहिले डोळे खुले.....
यायची होतीस तू.....मी शब्द माझे पाळले!

ठाव दुनियेच्या दिलाचा शब्द घेवू लागले;
मी लिखाणातून जेव्हा आपल्याला गाळले!

रूपरंगाने कितीही देखणे असले तरी;
कागदाचे फूल कोणी कुंतली का माळले?

पापण्यांच्या वळचणीला आसवे सांभाळली......
त्याच अश्रूंनी मलाही शेवटी सांभाळले!

तूच वारा, तू किनारा, लाट मी आहे तुझी;
लाखदा उसळेन मीही, तू जरी फेटाळले!

हा कुणाचा हात फिरतो माझिया डोक्यावरी?
तूच नजरेने मला नाहीस ना कुरवाळले?

तेज सूर्याचे झळाळे चेहऱ्यावरती तुझ्या;
राख मी झालो परंतू मी तुला न्याहाळले!

ही कुणाच्या पावलांची ऎकतो चाहूल मी?
तू इथे नाहीस अन् हे श्वास का गंधाळले?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१