ही ज्योत काळजाची मी मालवू कशाला?

गझल
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागाल/गालगागा/गागाल/गालगागा
****************************************

ही ज्योत काळजाची मी मालवू कशाला?
आहे उजेड तोही, मी घालवू कशाला?

मी सोसतो कधीचे पायांमधील काटे;
दुखऱ्याच पावलांना मी चालवू कशाला?

धोके, दगे, मुखवटे, कावे बघून झाले!
आता नवीन सोंगे, मी पालवू कशाला?

का मोजदाद ठेवू, गगनस्थ तारकांची?
बुद्धी उगाच माझी, मी चालवू कशाला?

सौंदर्य निखळ आहे! चिरफाड का करू मी?
जे गोड! त्यात साखर, मी कालवू कशाला?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१