ग्रहासारखा जो तो फिरतो, प्रत्येकाला घरघर असते!

गझल
    जाति: पद्मावर्तनी   
अष्टमात्रक आवर्तनांची जाति
मात्रा: ८+८+८+८=३२मात्रा
*************************************************

 ग्रहासारखा जो तो फिरतो, प्रत्येकाला घरघर असते!
वाट सरळ कोणतीच नसते, कुठे तरी ती खडतर असते!!

कुणी पाहिली? कुणी मोजली? व्यथा मनाच्या खांद्यावरची;
कधी कधी ती मणभर असते, कधी कधी ती कणभर असते!

प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक झरा प्रेमाचा असतो;
हेवेदावे, रुसवेफुगवे, सारे सारे वरवर असते!

आई म्हणजे, वात्सल्याचा, एक अनावर पान्हा असतो!
आई! आई! घर हंबरते, अन् आईही घरभर असते!!

रोजच येते ज्यास प्रचीती, ना दिसणाऱ्या परमेशाची;
असो कितीही दुबळा तो पण, श्रद्धा त्याची कणखर असते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१