हात दिला हातात तुझ्या मी!

गझल
जाति: पद्मावर्तनी
अष्टमात्रक आवर्तनांची जाति
मात्रा: ८+८=१६मात्रा
**********************************

हात दिला हातात तुझ्या मी!
तू माझ्या हृदयात तुझ्या मी!!

दूर तुझ्यापासून कुठे मी?
        एकेका श्वासात तुझ्या मी!

उंबरठ्यासारखेच अगदी,
तगमगलो दारात तुझ्या मी!

चुकलेल्या गलबताप्रमाणे;
भिरभिरलो डोळ्यात तुझ्या मी!

शब्द तुझे, पण, मिठास माझी!
विरघळलो ओठात तुझ्या मी!!

कोठे गेले थडगे माझे?
वणवणलो शहरात तुझ्या मी!

चुकामूक दोघांची झाली...
तू माझ्या नादात तुझ्या मी!

दिवस असो वा रात्र असू दे;
वावरतो स्वप्नात तुझ्या मी!

कोसळलो पण, सुदैव माझे...
गडगडलो पदरात तुझ्या मी!

उद्यानातच ऐट फुलांची!
विराजलो गजऱ्यात तुझ्या मी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१