एकटा गेला, परंतू पावले सोडून गेला!

आमचे गुरू, कविवर्य श्री. सुरेश भट यांना अर्पिलेली ही  आमची गझल! ही गझल मुसलसल गझलेच्या अंगाने जाणारी एक गझल रचना आहे.

गझल
वृत्त: व्योमगंगा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगागा
****************************************

एकटा गेला, परंतू पावले सोडून गेला!
एक हमरस्ता जगाला, काल तो देऊन गेला!!

आजही गझलेत त्याच्या केवढे चैतन्य आहे!
वाटते गझलेवरी तो, प्राण ओवाळून गेला!!

शेर आहे की, सुभाषित; आज त्यांना बोध झाला;
काल त्याला मात्र, जो तो, टोमणे मारून गेला!

हा नव्हे एल्गार! ही तर, एक गझलांचीच गीता!
आज जो तो बोलतो जे, काल तो बोलून गेला!!

ठेवल्या मागेच त्याने स्पंदणाऱ्या सर्व गझला!
टोमणे, टीका, टवाळी, सर्व तो घेऊन गेला!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१