सुने सर्व रस्ते, पुकारू कुणाला?

गझल
वृत्त: भुजंगप्रयात
लगावली: लगागा/लगागा/लगागा/लगागा
*************************************

सुने सर्व रस्ते, पुकारू कुणाला?
तुझा थांगपत्ता विचारू कुणाला?

तुझ्यासारखी झाक नाही कुणाची;
तुझ्या कुंचल्याने चितारू कुणाला?

धरा मोहवी, व्योमही साद देई!
कुणाला स्मरू अन् झुगारू कुणाला?

पिशाच्चे स्मृतींची, भुते वास्तवाची.....
सगे सर्व माझे! नकारू कुणाला?

चुका त्याच त्या होत आहेत माझ्या;
गुन्हेगार मी, मी सुधारू कुणाला?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१