काय हे प्राणांत माझ्या सारखे झंकारते?

गझल
वृत्त: देवप्रिया
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा
*************************************************

  काय हे प्राणांत माझ्या सारखे झंकारते?
तू दिलेल्या वेदनेची एकतारी वाजते!
   
साथ येते, हात देते, ही कुणाची सावली?
कोण जाणे, कोण माझ्या सोबतीला चालते!

ऊन्ह माध्यान्हातले मी, तू पहाटेची प्रभा!
आग जी हृदयात माझ्या, तीच तूही साहते!!

मी शिगेला पोचलेल्या मारव्याची आर्तता!
पूर्तता तू! सांगता तू! भैरवी तू वाटते!!

रोज उल्कापात होतो, कल्पनाही ना नभा!
ऊर धरणीचे परंतू रोज थोडे फाटते!!

हाय सोन्याचा मुलामा काय किमया दाखवी?
खुद्द सोन्याची परीक्षा पितळ घेवू पाहते!

कोणता नुसता मुलामा? चोख सोने कोणते?
हे कळायाला नजरही चोख व्हावी लागते!

ईश्वराला वाहलेले फूल आहे एक मी......
सांग, निर्माल्यातले का फूल कोणी माळते?

दूर कोनाड्यात एका मेणबत्तीसारखे......
जन्म सारा जाळुनी का शब्द कोणी पाळते?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१