उगाळतो मी तुझ्या स्मृतींचे चंदन अजून सुद्धा!

गझल
वृत्त: मात्रा वृत्त
मात्रा:८+८+८+४=२८
**************************************

उगाळतो मी तुझ्या स्मृतींचे चंदन अजून सुद्धा!
तुझीच मूर्ती मनात करते नर्तन अजून सुद्धा!!

तुझे नि माझे प्रेम पाहिले लक्ष लक्ष ताऱ्यांनी;
हरेक तारा लवून करतो वंदन अजून सुद्धा!

फूल फूल दरवळू लागले तुझ्या अधर स्पर्शांनी;
हुळहुळते प्राणांत तरूच्या चुंबन अजून सुद्धा!

कुठून आले पंखांमध्ये बळ इतके उडण्याचे?
मला तोलते तुझे रेशमी बंधन अजून सुद्धा!

रुणझुणणारी तुझी पैंजणे हृदयामध्ये रुतली;
युगे लोटली तरी चालले स्पंदन अजून सुद्धा!

चराचराची सतार सांगा, कुणी छेडली आहे?
अनाहताचे ऎकू येते गुंजन अजून सुद्धा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१