जीवाश्म मी! जणू मी, तो काळ, लोटलेला!

गझल
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा
*****************************************************

जीवाश्म मी! जणू मी, तो काळ, लोटलेला!
क्षण एक एक माझ्या हृदयात गोठलेला!!

प्रत्येक रात्र आता वाटेल पौर्णिमेची;
माझ्या उरात आहे तो चंद्र कोरलेला!

काही पुढून, काही मागून वार झाले;
प्रत्येक घाव माझ्या प्राणांत पोचलेला!

गेले जरी दवाचे पक्षी उडून सारे;
पानाफुलांत त्यांचा आभास गोंदलेला!

माझे नशीब सुद्धा होईल आज जागे;
बदलीत कूस आहे तो सूर्य झोपलेला!

माझ्या मते प्रसिद्धी हा दागिना गळ्याचा;
ज्याच्यामधेच असतो गळफास गोवलेला!

त्यांनी जरी पुरावे वेचून नष्ट केले;
त्यांच्या मनात त्यांचा अपराध नोंदलेला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१