चहूकडे तूच तू! तरीही, तुलाच धुंडाळतो कधीचा!

गझल
वृत्त: मात्रा वृत्त
मात्रा: ८+८+८+८=३२मात्रा
*********************************

चहूकडे तूच तू! तरीही, तुलाच धुंडाळतो कधीचा!
कितीक गेली प्रकाशवर्षे, असाच मी चालतो कधीचा!!

तुझी हवा अन् तुझाच वारा, तुझ्याच लाटा, तुझा किनारा!
तुझ्याच मर्जीनुसार एका लयीत मी वाहतो कधीचा!!

कळीकळीच्या स्मितामधे तू! उजाड, वठल्या तरूमधे तू!
हरेक रंगामधे तुझ्या मी भिनावया पाहतो कधीचा!!

विजेप्रमाणे चकाकुनी तू क्षणात गेलीस दूर कोठे?
बघावया पावले तुझी मी तमात रेंगाळतो कधीचा!

मशाल घेवून काळजाची तुलाच शोधावया निघालो;
तुझ्याचसाठी कितीक रात्री अशाच मी जाळतो कधीचा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१