ये सुखा! गुंडाळल्या मी वेदना!.....तरही गझल

तरही गझल
वृत्त: मेनका
लगावली: गालगागा/गालगागा/गालगा
***********************************************

ये सुखा! गुंडाळल्या मी वेदना!
येत जा, देवून थोडी कल्पना!!**

ओठ माझे, दातही माझेच हे;
हाय! मी, माझीच केली वंचना!

तोंड पाटिलकी* करावी केवढी?
आज जो तो फक्त करतो वल्गना!

मी जगासाठीच केली भिक्षुकी;
माझियासाठी न माझी याचना!

दान असते गौण, तू दानत पहा;
शेवटी जी पोचते, ती भावना!

याच चिंतेने न लिहिले पत्र मी;
काय पत्राचा असावा मायना?

शायराच्या, जा प्रथम, वंशामधे;
मग तुला कळतील त्याच्या यातना!

शायरी म्हणतोस तू कोणापुढे?
संपल्या ज्यांच्यातल्या संवेदना!

नाव होण्यास्तव किती आटापिटा!
कोण करतो शायरीची साधना?

आपल्यासाठीच त्यांचे साकडे.....
कोण करतो का कुणास्तव प्रार्थना?

काय लिहिली जात आहे शायरी?
काय ती देणार मजला चालना?

मी मनाला दावणीला बांधले;
जाहल्या ओढाळ जेव्हा वासना!

शिखर तू आहेस, अन् मी पायथा!
आपल्यामध्ये कशाचा सामना?

एवढ्या वेळेस स्वप्ने भंगली;
आज नाही कोणतीही कामना!

श्वास कर्जाऊच सारे.....जाणतो!
हात दे, आता तरी, मज जीवना!!

माणसांमधली समजली अंतरे;
अंतरावरुनीच करतो वंदना!

रांगते वार्धक्य हे बाल्यापरी.....
येवुनी गेलास केव्हा यौवना?

माणसे येतील तुज छाटायला.....
साप परवडले अरे, ते चंदना!

जाहली पडझड, पळाले सोबती.....
फक्त उरलो मीच माझ्या सांत्वना!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७ ८४९६१

**डॉ. कैलास गायकवाड यांची ओळ.
*तोंड पाटिलकी करणे म्हणजे स्वत: स्वस्थ बसून इतरांस काम करावयास सांगणे, लुडबुडेपणाची वटवट करणे.
................................................................