जीव कोणी लावल्याचे ज्ञात नाही!

गझल
वृत्त: मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
************************************

जीव कोणी लावल्याचे ज्ञात नाही!
त्यास, कोणीही दिलेला हात नाही!!

कोकिळेची धून फोनातून वाजे;
कोकिळा कुठलीच आता गात नाही!

का कुणी उल्लेखही माझा करावा?
मी कुठेही येत नाही, जात नाही!

बाब कुठलीही असू द्या, हे पहावे.....
आपले मन आपल्याला खात नाही

राहिलो आजन्म अंधारामधे मी!
एक मी कंदील, ज्याला वात नाही!

खेळ हे सारे तुझ्या, निव्वळ मनाचे!
वाटते तुजला तसे अजिबात नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१