दिवाळी अंक २०१३ - शरयूकाठचा चक्कीवाला

(चार्ल्स मॅकके यांच्या 'मिलर ऑफ द डी' या कवितेचा स्वैर अनुवाद):
(संदर्भ : दुवा क्र. १)

एक रांगडा चक्कीवाला शरयूकाठी राहत होता
श्रमता झिजता आनंदाचे गीत स्वच्छंद गात होता

अर्थ तयाच्या गाण्याचाही होता इतका सोपा, सुंदर -
"मला न मत्सर कोणाचाही, कुणा न वाटे माझा मत्सर! "

"असत्य मित्रा, तुझे बोलणे!" राजा दशरथ त्याला वदला
"तुझ्या निरागस हृदयाइतके हृदय लाभले नाही मजला"

"पण सांग मला तू येते कोठुन गीत सुखाचे तुझिया ओठी?
राजा असुनी सदैव असते दुःखच मोठे माझ्यापाठी! "

चक्कीवाला खुल्या दिलाने हसत म्हणाला झटकुन टोपी
"कर्ज न चिंता, ओझे कुठले कधी न माझे अंतर व्यापी! "

"बायको-मुले, मित्र मंडळी यांत साठले माझे जीवन
जिच्यामुळे हे चाले गाडे, त्या शरयूला करतो वंदन! "

"वा! मित्रा वा! सुखी राहा तू" राजाने प्रेमाने म्हटले,
"मात्र तुझ्या या गीताचे बघ शब्द जरासे इतके चुकले... "

"म्हणू नको रे पुन्हा कधी तू तुझा न वाटे कोणा मत्सर
तुझ्या फाटक्या टोपीपुढती गमे मुकुटही मजला लक्तर! "

"तुझ्यासारखी प्रजा खरी ह्या राज्याचे बघ आहे भूषण
वाटे इतक्या सौख्यासाठी तुला करावे राज्यच अर्पण! "

- कुमार जावडेकर