फुले तुझी, पण, सुवास माझा!

गझल   
वृत्त: जलौघवेगा
लागावली: लगालगागा/लगालगागा
**********************************************

 फुले तुझी, पण, सुवास माझा!
तुझ्यात होईल भास माझा!!

कसा तुझा मी निरोप घेवू?
कसा करू मी प्रवास माझा?

तहानलेली नदी म्हणाली.....
"मलाच ठाऊक ध्यास माझा!"

लिही ललाटी तुला हवे ते;
मला करू दे प्रयास माझा!

तुझीच या काळजात वस्ती!
तपास एकेक श्वास माझा!!

गुन्हा कुणाचा? कुणास फाशी?
अचूक होता कयास माझा!

लपेटली बासने मलाही;
उपाय केला झकास माझा!

भिकार झाली न भूक माझी;
न सोडला मी उपास माझा!

------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१