नभी मेघ हिंडायचे बंद झाले!

गझल
वृत्त: भुजंगप्रयात
लगावली: लगागा/लगागा/लगागा/लगागा
*********************************************

नभी मेघ हिंडायचे बंद झाले!
वनी मोर नाचायचे बंद झाले!!

अरे माणसा काय केलेस तू हे?
ऋतू यायचे जायचे बंद झाले!

कुणी घातला बांध गाण्यास त्यांच्या?
झरे वाहते गायचे बंद झाले!

तुझे बोल बोलायला लागलो मी;
तसे लोक बोलायचे बंद झाले!

मनोरंजनाला अहोरात्र टीव्ही!
पहा लोक वाचायचे बंद झाले!!

           न श्रोत्यांस, ना बासरीला कळाले....
कधी श्वास चालायचे बंद झाले!

कशी माणसे शुष्क पाषाण झाली?
तुझे नाव गोंदायचे बंद झाले!

किती रोज निर्यात व्हावी फळांची?
तरूंना फळे यायचे बंद झाले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१