अव्याहत चालायाचे पायांनी कबूल केले!

गझल
वृत्त: मात्रा वृत्त
मात्रा: १४+१४=२८मात्रा
****************************************************

अव्याहत चालायाचे पायांनी कबूल केले!
क्षण एक एक जगण्याचे श्वासांनी कबूल केले!!

त्या पहिल्या भेटीमधले, संभाषण मौनामधले;
जे मनात होते ते ते, डोळ्यांनी कबूल केले!

त्यामुळेच झालो राजी; मी गझला लिहिण्यासाठी,
ह्रदयास थेट भिडण्याचे शब्दांनी कबूल केले!

दिसतात जगाला काटे.... मी म्हणू लागलो तेव्हा....
ह्रदयातच घर करण्याचे काट्यांनी कबूल केले!

काळजात अजुनी माझ्या तेवते ज्योत स्वप्नांची,
तिमिरात हात देण्याचे स्वप्नांनी कबूल केले!

वैराण माळही क्षणभर बहरला मनाने थोडा;
ना चुकता बरसायाचे मेघांनी कबूल केले!

मी दिले सुकाणू माझे, लाटांच्या हातामध्ये;
न्यायचे तटावर मजला, लाटांनी कबूल केले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१